समुद्राची पातळी वाढण्याचा धोका
समुद्राची पातळी वाढण्याचा धोका जगभरात वाढतोय. संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालानुसार २०५० पर्यंत याचा फटका सात देशांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. भारतालाही याचा धोका असून, त्याची सुरवात कोकणात दिसत आहे. पावसाळ्यात किनाऱ्यांची वाढती धूप, गावांना पडणारा पाण्याचा वेढा, किनाऱ्यांलगतच्या गावांत घुसू पाहणारं समुद्राचं पाणी यामुळं या धोक्याची तीव्रता लक्षात घ्यायला हवी.
गेली काही वर्षं सातत्यानं जगात समुद्रांच्या पातळीत वाढ होत आहे. ग्लोबल एन्व्हायर्न्मेंटल आऊटलूक (Global Environmental Outlook : जागतिक पर्यावरणीय दृष्टिकोन) या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण प्रकल्पाच्या अलीकडंच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सागर पातळीतल्या वाढीच्या वेगानं आता वेग घेतला असून २०५० पर्यंत दक्षिण व आग्नेय आशियातल्या समुद्राच्या किनाऱ्यावरील वस्त्यांना याचा मोठा फटका बसेल. जागतिक पर्यावरणाविषयी केलेला हा सखोल, मुद्देसूद आणि विश्वासार्ह अहवाल म्हणून त्याला मान्यता मिळत आहे.
जगातल्या दहा देशांचं यामुळं अतोनात नुकसान होणार असून त्यातले सात देश हे आशिया- प्रशांत भागातीलच आहेत. बांगला देशातील अडीच कोटी, चीनमधले दोन कोटी आणि फिलिपिन्समधले दीड कोटी लोक आपद्ग्रस्त होतील. आपल्या देशात मुंबई आणि कोलकाता, चीनमधलं शांघाय आणि ग्वांग्झू, किनारी प्रदेशातली बांधकामं, धक्के व बारमाही बंदरांची निर्मिती, समुद्रातून होणारी वाहतूक, किनाऱ्याजवळच्या भागात ऊर्जेसाठी चालू असलेली खोदकामं, पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी सुरू असलेली अनिर्बंध बांधकामं अशा सर्व कामांमुळं आधीच किनाऱ्यावरच्या भूशास्त्रीय व जैविक प्रक्रियांवर मोठा ताण आहे, त्यामुळं समुद्रपातळीच्या वाढीला सामोरं जायला जगातले समुद्रकिनारे असमर्थ बनत आहेत. किनाऱ्यांचं पर्यावरण झपाट्यानं अतिसंवेदनशील बनत आहे.
पावसाळ्यात किनाऱ्यांची वाढती धूप, गावांना पडणारा पाण्याचा वेढा, किनाऱ्यांलगतच्या गावांत घुसू पाहणारं समुद्राचं पाणी यांसारख्या घटना आपल्याकडं कोकणात वारंवार दिसू लागल्या आहेत. या घटना एकाएकी दिसू लागलेल्या नाहीत. त्या हळूहळू दृश्यरूप धारण करू लागल्या आहेत. उथळ होणारी नदीपात्रं आणि सर्वत्र संथ गतीनं उंचावणारी समुद्राची पातळी यांचा पूर आणि किनाऱ्यांची धूप हा दृश्य परिणाम आहे. जगातल्या एकूण लोकसंख्येच्या पंचावन्न टक्के लोकसंख्या समुद्र किनाऱ्यांच्या सपाट प्रदेशात केंद्रित झाली आहे. यातले बहुतांश लोक आणि त्यांची मालमत्ता समुद्राच्या भविष्यातल्या भयावह आक्रमणाच्या दाट छायेखाली आहे. समुद्रपातळीतली वाढ ही तशी माणसाच्या नियंत्रणाबाहेर असलेली समस्या; पण कोट्यवधी लोकांच्या जीवित आणि वित्ताशी निगडित म्हणून ती संवेदनशील समस्या आहे.बांगला देशातलं ढाका, म्यानमारमधलं रंगून, थायलंडमधलं बॅंकॉक, व्हिएतनाममधलं हो चि मिन्ह आणि हाय फोंग या शहरांना मोठा धक्का असेल. येत्या काही वर्षांत किनाऱ्यावरच्या वादळांची संख्या व तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्यांचा जबर फटका बांगला देश, चीन, भारत आणि फिलिपिन्स या देशांना बसेल.
विसाव्या शतकात जगातल्या बहुतांशी समुद्रकिनाऱ्यांचा अभ्यास करता असं लक्षात आलंय, की दरवर्षी एक ते पाच मिलिमीटर या वेगानं समुद्राची पातळी वाढली आहे. एकविसाव्या शतकात हा वेग तीनपट म्हणजे दरवर्षी १५ मिलिमीटर, तर २१०० च्या अखेरीस ५० सेंमी ते दीड मीटर असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वाढीत उंच पर्वतशिखरांवरील बर्फाचा सहभाग १० ते ५० सेंमी पातळी वाढविण्यात, तर ग्रीनलंडवरील बर्फाचा १३ ते ३५ सेंमी, अंटार्क्टिकवरच्या बर्फाच्या विलयनाचा २० ते ३७ सेंमी व औष्णिक प्रसरणाचा ११ ते ३७ सेंमी पातळी वाढविण्यात सहभाग असेल, असंही गणित मांडण्यात आलं आहे.
समुद्राची पातळी वाढण्याची प्रक्रिया जागतिक आणि स्थानिक पातळीवरच्या कारणांमुळं होईल. हिमटोप आणि हिमनद्यांमधलं बर्फ वितळण्याची क्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. मनुष्यनिर्मित प्रदूषणानं त्याला हातभारही लागतो आहे. यामुळं जागतिक स्तरावर समुद्राची पातळी वाढू लागली आहे. किनाऱ्याजवळचा प्रदेश खचल्यामुळं किंवा उंचावल्यामुळंही समुद्राच्या पातळीत स्थानिक स्तरावर हालचाल घडत असते. जिथं जमीन खचण्याचा वेग जास्त आहे, तिथं समुद्राची पातळी वाढण्याचा वेगही जास्त आहे. जगाच्या काही भागांत गेल्या ५० वर्षांत स्थानिक पातळीवर समुद्राची पातळी १० सेंटिमीटरनं म्हणजे जागतिक वेगाच्या दुप्पट वेगानं वाढली आहे. समुद्राच्या पातळीतल्या वाढीमुळं किनाऱ्यावर संथ गतीनं होत असलेल्या समुद्राच्या या आक्रमणाचे पर्यावरणीय परिणाम सर्वव्यापी आणि दूरगामी असून आता ते विविध स्वरूपांत अनेक ठिकाणी दिसून येऊ लागलेत. किनाऱ्यांची गेल्या काही वर्षांपासून होऊ लागलेली धूप, पाणथळ व दलदलीच्या प्रदेशांची कमी होणारी संख्या, वादळी महोर्मीतली (Storm Surges) वाढ, नदीमुखं व त्रिभुज प्रदेशांचे होणारे स्थानबदल, किनाऱ्यांवरच्या जमिनींची, खाड्या आणि विहिरींची वाढणारी क्षारता, खारफुटी वनस्पती आणि समुद्री जीवांचा वाढता नाश अशा गोष्टी आता ठिकठिकाणी डोकं वर काढू लागल्या आहेत. महाराष्ट्राचा कोकण किनाराही याला अपवाद नाही !
समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळं किनाऱ्यावर असलेली बेटं पाण्याखाली जाण्याचा धोका मोठा आणि नक्की आहे. सर्वच किनाऱ्यांवरची खारफुटी आणि पाणथळ प्रदेश यांचं संरक्षक पट्टा (Buffer) म्हणून असलेलं कार्य संपुष्टात येईल. अनेक पक्षी आणि प्राण्यांचे आवास नष्ट होतील. वादळी महाकाय लाटा वाढून किनारी वस्त्या आपत्तीग्रस्त होतील. पावसाचं प्रमाण वाढून जमिनीवरची प्रदूषकं समुद्रात जातील आणि त्यातील नायट्रोजन व फॉस्फरसमुळं किनाऱ्याजवळच्या प्रदेशातील जलचर नष्ट होतील. उष्णता संवेदनशील जलचरांचे निवास उत्तरेकडे सरकतील. समुद्रजलाची खोली, पातळी आणि तापमान, क्षारता, घनता बदलल्यामुळं प्रवाळ, जलजशैव आणि शेलफिश अस्तंगत होण्याचा धोकाही वाढेल. किनारी मैदानं, लगुन्स, त्रिभुज प्रदेश आणि पुळणींच्या प्रदेशात समुद्र दरवर्षी ५ मीटर रुंदीचा किनारा गिळंकृत करेल.
या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपल्यापुढं फारसे पर्याय नसले तरी संयुक्त राष्ट्र संघटनेचा अहवाल गांभीर्यानं घेऊन, पुन्हा एकदा सगळ्या किनारी प्रदेशांच्या सध्याच्या पर्यावरणाचा आढावा घेऊन, भविष्यातल्या समुद्रपातळीच्या वाढीच्या संदर्भात विकासकामं, वस्त्या यांचं फेरनियोजन करणं आता आवश्यक झालं आहे. यासाठी माणसानं समुद्राच्या म्हणजेच किनारी भागातल्या पर्यावरणात चालवलेली ढवळाढवळ कमी करणं हा एक महत्त्वाचा उपाय, हवेचं प्रदूषण कमी करणं हा दुसरा उपाय आणि हे काहीच जमलं नाही, तर किनाऱ्यावरच्या प्रदेशातून स्थलांतर करणं हा अखेरचा उपाय आपल्या हाती असेल, यात आजतरी शंका नाही.
---------------------------------------------------------------------------
उत्तर गोलार्धात धोका जास्त...
समुद्राच्या पातळीतली संभाव्य वाढ ही जगभरात निरनिराळ्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या निरीक्षणावरून व मोजमापावरून वर्तविलेली असते. वाढीच्या आकडेवारीच्या विविध ठिकाणच्या नोंदी लक्षात घेतल्यावर असं लक्षात येतं की समुद्राच्या पातळीतल्या बदलांची नोंद करणारी ठिकाणं प्रामुख्यानं उत्तर गोलार्धात आहेत. समुद्रापेक्षा जमिनीचं प्रमाण या भागात जास्त असूनही या वाढीचं प्रमाण या भागात अधिक आहे. याचं कारण ३० अंश ते ६० अंश उत्तर अक्षवृत्ते आणि ६० अंश ते १२० अंश पूर्व रेखावृत्तं यातला प्रदेश वगळता या गोलार्धात किनारपट्ट्या मोठ्या प्रमाणावर आहेत. दक्षिण गोलार्धात खुल्या समुद्राचं प्रमाण मोठं आहे. समुद्राच्या पातळीतल्या वाढीबद्दलच्या बदलांची नोंद करणारी सर्वाधिक ठिकाणं उत्तर गोलार्धातला युरोपियन देश आणि संयुक्त संस्थानांची पूर्व व पश्चिम किनारपट्टी यावर आहेत. दक्षिण गोलार्धात अशी ठिकाणं केवळ दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी या भागात आहेत. संपूर्ण जगाचा विचार करता ही ठिकाणं संख्येनं कमी असल्यामुळं समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीचा निष्कर्ष सगळीकडं योग्य ठरेल असं नाही, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र उपलब्ध नोंदींपैकी बहुतांश नोंदी समुद्राची पातळी वाढतीय असंच दाखवत आहेत. ती कमी होतीय असं दाखविणाऱ्या नोंदी खूपच कमी आहेत. भविष्यातल्या या संकटाकडं त्यामुळंच डोळेझाक करून चालणार नाही, हे नक्की
संभाव्य आपत्ती लक्षात घेण्याची गरज...
आपल्या देशाला ५ हजार ७०० किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरच्या सपाट प्रदेश आणि विविध बेटांना समुद्राची पातळी वाढून त्यांना जलसमाधी मिळण्याचा मोठा धोका आहे. किनाऱ्यापासून ३ ते ४ मीटर उंचीवरच्या सगळ्याच प्रदेशांना भविष्यकाळात सतर्क राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आजपासूनच स्थानिक भूरचना पाहून त्यानुसार वाढणाऱ्या पाण्याला प्रतिबंध करण्याच्या योजना आखाव्या लागतील. वस्त्यांचं स्थलांतर थोड्या अधिक उंचीवर करणं अनेक ठिकाणी अपरिहार्य ठरेल असे आत्ताचा समुद्रपातळीच्या वाढीचा वेग पाहिल्यावर लक्षात येतं. भरती- ओहोटीमध्ये जिथं चार मीटरपेक्षा जास्त तफावत असेल आणि सहा मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा तयार होतील तिथं या आपत्तीचा तडाखा जोरदार असेल हे लक्षात घेऊन किनारा व मानवी वस्तीच्या रक्षणाच्या योजना आखाव्या लागतील.
संदर्भ: सप्तरंग, सकाळ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत