• New

    सागरी सामर्थ्यात नव्या अध्यायाची नांदी

    माझगाव डॉकमध्ये तयार झालेल्या "कलवरी‘ क्‍लासच्या पहिल्या पाणबुडीने अलीकडेच समुद्रचाचणीसाठी प्रस्थान ठेवले. सर्व चाचण्या पूर्ण केल्यावर ती नौदलात दाखल होईल. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या आक्रमणशक्तीत लक्षणीय वाढ होणार आहे.
    ऑगस्टा हेलिकॉप्टर प्रकरणाच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात तमाम जनतेच्या नजरेआड झालेली एक ठळक घटना म्हणजे माझगाव डॉकमध्ये बनवलेल्या "कलवरी‘ क्‍लासच्या पहिल्या पाणबुडीचे समुद्रचाचणीसाठी प्रस्थान. जवळजवळ दीड दशकापूर्वी भारताने फ्रान्सच्या "डीसीएनएस‘ या प्रसिद्ध उद्योगाच्या साह्याने भारतीय नौदलासाठी सहा "कलवरी‘ क्‍लास स्टेल्थ पाणबुड्या माझगाव डॉकमध्ये उभारण्याचा "पी 75‘ नामक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला; पण वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची प्रगती वारंवार खुंटत गेली. अखेरीस त्यातील पहिली पाणबुडी - "कलवरी टायगर शार्क‘ पूर्णतः तयार झाल्यावर वेगवेगळ्या अंतिम चाचण्यांसाठी अरबी समुद्रात प्रविष्ट झाली. अपेक्षित चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ती भारतीय नौदलात दाखल होईल. "कलवरी‘ क्‍लासच्या या सहा आक्रमक पाणबुड्या (अटॅक सबमरीन्स) नजीकच्या भविष्यात उपलब्ध झाल्यावर भारतीय नौदलाच्या आक्रमणशक्तीत लक्षणीय वाढ होणार आहे.
    कोणत्याही नौदलाच्या सामर्थ्याची तीन परिमाणे असतात. समुद्रतळावर तरंगणाऱ्या फ्रिगेट, विनाशिका, कॉरव्हेट वगैरे लढाऊ नौका; शत्रूच्या नौदलावर आकाशमार्गे हल्ला करण्यासाठी विमानवाहू नौकांवरून समुद्रावर उड्डाण करणारी नौदलाची विमाने; आणि पाण्याखाली संचार करू शकणाऱ्या पाणबुड्या. यातील प्रत्येकाचा सहभाग समसमान; परंतु पाण्याखाली गुप्तपणे वावरत अचानक अवतरून शत्रूच्या महाकाय लढाऊ नौकेवर जोरदार हल्ला चढवणारी चपळ पाणबुडी या तिन्हींमध्ये सर्वाधिक भीतिप्रद. याबरोबरच देशाच्या अण्वस्त्रसज्जतेनंतर पाणबुडीला आणखी एक बिनीचा मानदंड लाभला आहे. अण्वस्त्रवाहक प्रक्षेपणाचा मारा आकाशमार्गे, जमिनीवरून किंवा पाण्याखालून केला जाऊ शकतो. परंतु, यातील सर्वाधिक सुरक्षित पर्याय म्हणजे पाण्याखाली दडवलेल्या क्षेपणास्त्राचा. त्याचे कारण एकदा का अण्वस्त्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला, की सर्वांत अग्रगण्य लक्ष्य म्हणजे शत्रूने अण्वस्त्रे ठेवलेली ठिकाणे (सायलो). आधुनिक तंत्रज्ञानामुळे जमिनीवरील या साठ्यांचा वेध घेणे अशक्‍य राहिलेले नाही; परंतु हेच अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र समुद्रतळाखाली गुप्तपणे वावरू शकणाऱ्या आणि आपले स्थान वेगाने बदलू शकणाऱ्या चपळ पाणबुडीवर ठेवले, तर ते शत्रूच्या आवाक्‍याबाहेर राहील आणि आपल्या इच्छेनुसार योग्यवेळी त्याचा उपयोग करता येईल.
    भारताचे दोन्ही प्रतिस्पर्धी भारताप्रमाणेच अण्वस्त्रसज्ज आहेत. त्यापैकी चीनची अण्वस्त्रक्षमता अतुलनीय आहे. परंतु, भारत आणि पाकिस्तान सर्वसाधारणतः समसमान आहेत. त्यापैकी भारत आणि चीन या दोघांनी "आपण अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही‘ ("नो फर्स्ट यूज‘) असे जाहीर केले आहे. परंतु, पाकिस्तानने मात्र या धोरणाशी स्पष्ट असहमती दर्शवली आहे. त्याचे कारण स्पष्ट आहे. अण्वस्त्रवापराच्या धमकीखाली दहशतवादी कृत्यांनी भारताला जर्जर करणे, हा पाकिस्तानच्या सामरिक धोरणाचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच पाकिस्तानने आपल्यावर पहिला अण्वस्त्र हल्ला (फर्स्ट स्ट्राइक) केला, तर आपली अण्वस्त्रे सुरक्षित राखून त्याच्यावर आपण प्राणघातक प्रतिहल्ला चढवू शकतो (सेकंड स्ट्राइक) ही जरब प्रतिस्पर्ध्याला बसवणे अत्यावश्‍यक आहे आणि हे उद्दिष्ट केवळ पाणबुडीच साधू शकते.
    माझगाव डॉकने याबाबतीत लक्षणीय योगदान दिले आहे. स्वतःच्या युद्धनौका स्वदेशात बनवणाऱ्या, हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या देशांच्या यादीत भारताने सात फेब्रुवारी 1992 रोजी "आयएनएस शल्की‘ माझगाव डॉकमध्ये उभारून प्रवेश केला. त्यानंतर माझगाव डॉक लिमिटेडने "लिअँडर‘ आणि "गोदावरी‘ क्‍लासच्या फ्रिगेट, "कुकरी‘ क्‍लासच्या कॉरव्हेट, "दिल्ली‘ आणि "कलकत्ता‘ क्‍लासच्या विनाशिका आणि "शिवालिक‘ क्‍लासच्या स्टेल्थ फ्रिगेट बनवल्या आहेत. त्याबरोबर "सिंधुघोष‘ क्‍लासच्या रशियन बनावटीच्या नऊ पाणबुड्या आणि "शिशकुमार‘ क्‍लासच्या जर्मन बनावटीच्या चार पाणबुड्याही उभारल्या. या सर्व युद्धनौका भारतीय नौदलात कार्यरत आहेत. या सर्वांत माझगाव डॉकच्या शिरपेचातील सर्वांत मानाचा तुरा म्हणजे त्यांनी उभारलेली भारताची पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी "आयएनएस अरिहंत‘. या प्रकल्पात चार पाणबुड्यांचा समावेश आहे. "अरिहंत‘ म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ! पहिल्या "अरिहंत‘ पाणबुडीचा भारतीय नौदलात 23 फेब्रुवारी 2016 रोजी प्रवेश झाला. त्यावरून भारतीय बनावटीची बारा के- 5 सागरिका क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. 
    अठरा हजार कोटी रुपयांचा "ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजी व्हेसल‘ (एटीव्ही) प्रकल्प 2001 मध्ये हाती घेण्यात आला. त्यासाठी अणुऊर्जेवर चालणारी भारतीय बनावटीची छोटेखानी अणुभट्टी बनवण्यात भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरने (बीएआरसी) अमूल्य सहकार्य दिले. अशा प्रकारची अणुऊर्जित पाणबुडी बनवणाऱ्या रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स या पाच अण्वस्त्रशक्तींनंतर भारत हा सहावा देश आहे. "अरिहंत‘च्या पाठोपाठ "आयएनएस अरिदमन‘ माझगाव डॉकमध्ये आकार घेत आहे. या वर्गाच्या चारही पाणबुड्या 2023 पर्यंत भारतीय नौदलामध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. या अणुऊर्जित पाणबुड्यांवरील अधिकारी आणि जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी भारताने रशियाकडून "अकुला‘ क्‍लासची "आयएनएस चक्र‘ ही पाणबुडी याआधीच भाडेतत्त्वावर घेतली आहे. अशा प्रकारे भारतीय नौदलाच्या दोन विमानवाहू नौका, नऊ "एलएसटी‘, दहा विनाशिका, 14 फ्रिगेट्‌स, 14 कॉरव्हेट्‌स, गस्त घालण्यासाठी 10 ऑफशोअर नौका, चार फ्लिट टॅंकर, एक अणुऊर्जित पाणबुडी आणि 14 इतर पाणबुड्यांच्या लढाऊ ताफ्यात आता सहा "कलवरी‘ क्‍लासच्या पाणबुड्या आणि तीन अणुऊर्जित पाणबुड्यांचा समावेश पुढील आठ-दहा वर्षांत होणार आहे. हा शस्त्रसंभार म्हणजे भारताच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी लक्षणीय प्रतिरोधशक्ती आहे, यात शंका नाही.
    भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात दिवसेंदिवस होणाऱ्या या लक्षणीय वाढीबाबत आणि त्यात माझगाव डॉकने केलेल्या तंत्रज्ञानातील असामान्य योगदानाबद्दल फार थोड्यांना कल्पना असेल. "कलवरी‘ पाणबुडीच्या प्रवेशाने आपल्या देशासाठी एका नव्या स्फूर्तिदायक अध्यायाची नांदी झाली आहे.

    शशिकांत पित्रे (निवृत्त मेजर जनरल)

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad