गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध
- गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध झाल्याचे लेसर इंटरफेरोमीटर ग्रव्हिटेशनल-व्हेव्ह ऑब्झरव्हेटरीतील (लायगो) शास्त्रज्ञांनी जाहीर केले.
- दोन कृष्णविवरांच्या टकरीतून गुरुत्वीय लहरी निर्माण होतात.
- 12 सप्टेंबर 2015 रोजी अशा लहरींचे अस्तित्व आढळून आले.
- या शोधामुळे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत बरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कशी निर्माण होतात गुरूत्वीय लहरी??
जुळी कृष्णविवरे ज्या वेळी एकत्र येतात आणि त्यातून महाकाय कृष्णविवर तयार होते. त्या वेळी गुरुत्वीय लहरी निर्माण होतात. कृष्णविवरे एकमेकांत मिसळली गेली की, अतिप्रचंड ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा काही क्षणांत लहरींच्या माध्यमातून सगळीकडे पसरली जाते.
गुरुत्वीय लहरी म्हणजे काय?
अवकाशातून जाणाऱ्या एखाद्या महाकाय वस्तूमुळे किंवा अवकाशात झालेल्या प्रचंड मोठ्या टकरींमध्ये तरंग (लहरी) निर्माण होतात. या तरंगांना किंवा लहरींना गुरुत्वीय लहरी म्हणतात. दोन न्यूट्रॉन तारे किंवा कृष्णविवरांच्या एकमेकांभोवती फिरण्यातून, ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व प्रयोगशाळेत मोजता येऊ शकते.
असा केला प्रयोग
गुरुत्वीय लहरी कोट्यवधी किलोमीटरचा प्रवास करून पृथ्वीवर आदळतात. बहुसंख्य वेळा त्या पृथ्वीवर पोचेपर्यंत क्षीण होतात. त्यामुळे त्याची नोंद घेता येत नव्हती. ही नोंद घेण्यासाठी अमेरिकेत दोन उपकरणे बसविली. त्याचा आकार इंग्रजीतील एल अक्षराप्रमाणे आहे. त्याची लांबी चार किलोमीटर आहे. त्यात दोन मोठे आरसे बसविले. दोन्हींमध्ये लेसर किरण सोडून दोन आरशांमधून जाणाऱ्या लहरींची नोंद घेण्यात आली.
पुढील पाऊल
सापेक्षतावादाचा सिद्धांताच्या अभ्यासातील पुढचे पाऊल हे "क्वांटम ग्रॅव्हिटी' सिद्धांताचे असेल. यासाठी "सापेक्षतावादाचा व्यापक सिद्धांत' आणि "क्वांटम मेकॅनिक्स' यांचा एकत्रित विचार करावा लागणार आहे. त्या दृष्टीनेही शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.
व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत ??
●प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी 25 नोव्हेंबर 1915 रोजी "व्यापक सापेक्षतावादा'चा सिद्धांत मांडला.
●त्या सिद्धांताची नुकतीच शताब्दी झाली.
●हा सिद्धांत मांडतानाच त्यांनी गुरुत्वीय तरंगांचे अस्तित्व मांडले होते. त्याचा शोध लेसर इंटरफेरोमीटर ग्रव्हिटेशनल-व्हेव्ह ऑब्झरव्हेटरीमार्फत (लायगो) घेण्यात आला.
■आपल्याला जे विश्व दिसते ते केवळ पाच टक्केच आहे. उर्वरित 95 टक्के विश्वातील प्रकाशकिरणांशी आपण संपर्क प्रस्थापित करू शकत नाही. मात्र तेथील गुरुत्वीय लहरी संपर्क साधतात, असे आइन्स्टाईन यांनी सिद्धांतात म्हटले आहे. मात्र या लहरी आपल्याला सापडू शकलेल्या नव्हत्या. "लायगो'च्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात आला.
>>आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेल्या गतीच्या नियमांनुसार प्रकाशकिरणांसह विद्युत-चुंबकीय लहरींची वागणूक स्पष्ट करता येत नाही आणि तो सिद्धांत विशिष्ट परिस्थितीमध्ये अभ्यास पुढे नेण्यास तोकडा पडतो. म्हणजे पृथ्वी व सूर्य हे गुरुत्वाकर्षण बलामुळे एकमेकांना धरून आहेत. पण समजा अचानक सूर्याने त्याचे स्थान बदलले तर न्यूटन यांनी मांडलेल्या सूत्रातील एक घटक निरुपयोगी ठरतो. त्या परिस्थितीचे विश्लेषण आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाच्या व्यापक सिद्धांतात केले. प्रचंड वस्तुमानाच्या वस्तूमुळे त्या भोवती असलेल्या अवकाशाला वक्रता येते. उदाहरणार्थ सूर्याच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्या भोवती जे अवकाश आहे ते वक्र बनले आहे आणि त्या वक्र अवकाशात पृथ्वी अडकली आहे. पृथ्वी आपल्या मार्गाने जात असली तरीही अवकाशच वक्र असल्यामुळे ती सूर्याभोवती फिरताना दिसते. पृथ्वीचे स्वत:चे वस्तुमान आणि अवकाशात असलेला वक्रपणा यामुळे ती सूर्यावर जाऊन आदळत नाही.
या सिद्धांतानुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो. निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. म्हणजे आपली गाडी किती वेगाने धावते यावर प्रकाशाचा वेग अवलंबून नसतो. तो कोणत्याही परिस्थितीत स्थिर असतो. हा सिद्धांत मांडल्यानंतर त्यावर अनेक वैज्ञानिकांनी आक्षेप घेतले. या सिद्धांताची सत्यात पडताळण्यासाठी 1919च्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्याचे निश्चित झाले आणि त्यानंतर हा सिद्धांत मान्य करण्यात आला.
आयुका'चा सहभाग
#या प्रयोगामध्ये "आयुका'तील संशोधकांचा सहभाग होता.
#भारतीय शास्त्रज्ञ सी. विश्वेश्वरय्या यांनी कृष्णविवरांवर काम केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत