पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट मदत मिळणार आहे. जिल्हा, विभागीय मुख्यालय व मोठी शहरे या ठिकाणच्या शिक्षण संस्थांमध्ये चालू वर्षी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या 20 हजार विद्यार्थ्यांना 2017-18 पासून कमाल 40 हजार 500 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही मदत थेट जमा होणार आहे.
मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार, महसुली विभागीय शहरांसाठी 5100 आणि इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी 4300 रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार आणि इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष दोन हजार रुपये शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी दिले जाणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल मात्र एखाद्या विद्यार्थ्यांची पात्रता, गुणवत्ता उच्च दर्जाची असेल तर त्याला शिक्षणापासून वंचित रहावे लागणार नाही, असा हा दूरगामी निर्णय विद्यमान शासनाने घेतला आहे.
Source: mahanews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत