परीक्षा देत असताना या गोष्टींकडे लक्ष असू द्या
सिली मिस्टेक्स टाळा
परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यात आपण
कमी पडतो आणि वेळेच्या ताणामुळे उत्तर चुकतो. फाजील आत्मविश्वासामुळे पूर्वग्रहाला
बळी पडतो आणि चुकतो. घाईघाईत प्रश्न वाचल्यामुळे चुकीचे उत्तर मार्क करतो. या चुका
टाळण्यासाठी प्रत्येक प्रश्न गांभीर्यपूर्वक वाचा. प्रश्न सोपा, माहीत
असणारा असला, तरीही!
प्रश्न नीट समजून घ्या
बहुतांश उमेदवारांना लवकर प्रश्न वाचून उत्तरांचे पर्याय
पाहण्याची घाई झालेली असते किंवा पर्याय वारंवार वाचण्याची सवय असते. उत्तरांचे
पर्याय वारंवार वाचून, अचूक उत्तर देता येणार नसते, हेच
मुळात उमेदवारांना उमजत नाही. दोन-चार वेळा उत्तरे वाचून बरोबर-चूक उत्तर शोधणे
अवघड असते. त्याऐवजी प्रश्न जास्त वेळा वाचला की बरोबर उत्तर निवडणे सोपे होते हे
परीक्षार्थीनी लक्षात घ्यावे. प्रश्न समजल्याशिवाय उत्तरांचे पर्याय पाहू नयेत.
प्रश्न वाचनातील घाई, अपघातास निमंत्रण देते म्हणून आपली योजना ‘सुरक्षित’ असायला
हवी.
परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकाच्या सूचनांवर फारसे विसंबून राहू नका. अनेकदा
पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेवर नोंदवायच्या माहितीबद्दल
पुरेशी माहिती नसते. यातून चुकीच्या सूचना दिल्या जातात आणि उमेदवारांचे नुकसान
होते.
परीक्षागृहामध्ये उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, केंद्र इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचत बसू नका. हातात आल्यावर ती
लगेचच सोडवायला सुरुवात करा. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून पेन्सिलने त्याच्या
पर्यायावर खूण करत पुढे जा.
एखाद्या प्रश्नाबाबत संभ्रम असेल, अवघड
वाटला असेल तर त्या प्रश्नक्रमांकावर खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत
प्रश्न सोडवण्याची पहिली फेरी संपवा. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्या पर्यायांचे
उत्तरपत्रिकेत अचूक मार्किंग करून घ्या. आता दुसरी फेरी. अवघड वाटणारे प्रश्न
सोडवायचा पुन्हा प्रयत्न करा. आधीच अशा प्रश्नांवर खुणा केल्याने हे प्रश्न शोधत
बसण्यात वेळ वाया जात नाही.
अजिबातच न येणाऱ्या प्रश्नांची काहीबाही उत्तरे देण्याची
चूक करू नका. अन्यथा नकारात्मक गुणांची शिक्षा महागात पडू शकते.
एकापेक्षा जास्त गोळे रंगवल्यास ते उत्तर तपासले जात नाही.
त्यामुळे ‘चुकून’ तुम्ही चुकीचा गोळा रंगवला असेल तर लक्षात
आल्याबरोबर त्याच्या शेजारचा गोळाही रंगवून टाका. जेणेकरून नकारात्मक गुणांचा फटका
बसणार नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत