• New

    अर्थसंकल्पाची चित्तरकथा..


    अर्थसंकल्प कोण तयार करतो?
    - अर्थसंकल्प निर्मिती ही दीर्घ सल्लामसलतींचा अंतर्भाव असणारी आणि अर्थमंत्रालय अंतर्बाह्य ढवळून काढणारी अतिशय गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया आहे. अर्थमंत्रालय, निती आयोग आणि संबंधित मंत्रालय यांच्या एकत्रित प्रयत्नांतून अर्थसंकल्प तयार करण्यात येतो.
    - खर्चांवर आधारीत मार्गदर्शक तत्वे अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात येतात. त्याप्रमाणे संबंधित मंत्रालये आपापल्या मागण्या समोर ठेवतात.
    - केंद्रीय अर्थव्यवहार खात्यातील अर्थसंकल्प विभागाकडे या प्रक्रियेची सर्व सूत्रे असतात. अर्थसंकल्पातील प्रत्येक तरतुदीची जबाबदारी अंतिमतः या विभागाकडे असते.
    ...
    अर्थसंकल्पाची निर्मिती
    - केंद्रीय अर्थव्यवहार खात्यातील अर्थसंकल्प विभागाकडून सप्टेंबर महिन्यातच सर्व मंत्रालयांना, राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना निवेदन पाठवले जाते. याशिवाय प्रमुख संरक्षण दलांनाही निवेदने पाठवून पुढील आर्थिक वर्षासाठी आवश्यक तरतुदीची शिफारस करण्याविषयी बजावण्यात येते.
    - त्यानंतर संबंधित मंत्रालये आणि विभाग त्यांच्या मागण्या पाठवितात. त्यानंतर संबंधित मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाची त्यातील आर्थिक तरतुदींवर विस्ताराने चर्चा होते.

    - वरील प्रक्रिया सुरू असतानाच अर्थव्यवहार खाते आणि महसूल विभागाकडून अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक असणाऱ्या शेतकरी, उद्योगपती, परकीय गुंतवणूकदार, अर्थतज्ज्ञ णि समाजाचे दृष्टिकोन समजून घेतले जातात.
    - दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस अर्थसंकल्पपूर्व बैठका संपतात. त्यानंतर अर्थमंत्री करप्रस्तावांबाबत अंतिम निर्णय घेतात. प्रत्यक्ष अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अर्थमंत्री करप्रस्तावातील तरतुदी आणि सूचनांबाबत पंतप्रधानांशी चर्चा करतात.
    ..
    अर्थसंकल्पाची मांडणी
    - केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प मांडण्याच्या तारखेला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्यानतंर लोकसभा सचिवालयाचे महासचिव राष्ट्रपतींच्या मंजुरीची वाट पाहतात.
    - अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी सकाळी राष्ट्रपतींकडून त्यावरील सारांश सादर केला जातो. अर्थातच या सारांशाला पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांची मान्यता असते.
     balajisurne.blogspot.in
    # अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण दोन भागांत विभागलेले असते.  
    >>पहिल्या भागात: देशाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा आणि धोरणात्मक निर्णयांचा समावेश असतो.
    >>दुसऱ्या भागात:  करविषयक तरतुदींचा समावेश असतो.
    - लोकसभेत अर्थमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतर अर्थसंकल्प राज्यसभेच्या पटलावर ठेवला जातो.
    - अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी आणि महत्त्वाचे विषय अर्थमंत्री आपल्या लोकसभेतील सादरीकरणात मांडतात.
    - अर्थमंत्र्यांकडून लोकसभेत अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी मंत्रिमंडळातील सदस्यांना थोडक्यात माहिती दिली जाते. या सारांशाला 'समरी फॉर दर कॅबिनेट' असे संबोधले जाते.
    - दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पाचे वाचन होत असताना कोणत्याही चर्चेचे आयोजन करण्यात येत नाही.
    ..
    अर्थसंकल्पाला मंजुरी
    - अर्थसंकल्पावर होणारी चर्चादेखील दोन भागांमध्ये विभागली जाते.
    ..
    सर्वसाधारण चर्चा :
    - अर्थसंकल्प सादरीकरणानंतर दोन ते तीनदिवसांनी लोकसभेत त्यावर चर्चा केली जाते.
    - दरम्यान, लेखानुदानाला मंजुरी देण्यात येते.
    - चर्चेच्या शेवटी अर्थमंत्री उत्तर देतात.
    - त्यानंतर लोकसभा ठरावीक काळासाठी तहकूब केली जाते.
    balajisurne.blogspot.in

    विस्तारित चर्चा :
    - तहकुबीच्या काळात संबंधित समित्यांकडून र्थिक तरतुदींची मागणी केली जाते.
    - या तरतुदी टप्याटप्याने लक्षात घेऊन लोकसभेच्या उद्योगविषयक सल्लागार मंडळाच्या देखरेखीसाठी पाठवले जाते.
    - मागण्या मंजूर झाल्यानंतर सुधारणा विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी ठेवले जाते. या माध्यमातून केंद्र सरकारला उर्वरित निधीएकत्रितरित्या खर्चण्याची संधी मिळते.
    - सुधारणा विधायकांना मंजुरी मिळाल्यानंतर वित्त विधेयक संसदेकडून मंजूर झाले असे मानले जाईल.
    - या विधेयकाला दोन्ही सदनांची मंजुरी मिळण्याची गरज आहे. विधेयक सादर झाल्यापासून ७५ दिवसांच्या आत त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी देणे आवश्यक आहे.
    - वित्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर तसेच, त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर अर्थसंकल्पाची प्रक्रिया संपुष्टात आल्याचे मानले जाते.
    - दुसऱ्या भागातील चर्चेच्या अखेरच्या दिवशी अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा होते. लोकसभेचे अध्यक्ष उर्वरित आणि प्रलंबित मागण्या सदनाच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवतात.
    .....................................
    अर्थसंकल्पाची छपाई
    - अर्थसंकल्पातील मजकुराची निर्मिती काही मोजक्याच अधिकाऱ्यांच्या आणि स्टेनोग्राफरच्या उपस्थितीत केली जाते. या साठी वापरले जाणारे कम्प्युटर आणि टाइपरायटर इंटरनेट अथवा तत्सम प्रणालींपासून तोडले जातात.
    - अर्थसंकल्प छपाईच्या काळात प्रक्रियेशी संबंधित सर्व तंत्रज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि अन्य मंडळींना बाह्य दुनियेशी संपर्क ठेवण्यास मनाई केली जाते. या सर्वांची राहण्याची व्यवस्था नॉर्थ ब्लॉकमध्ये करण्यात येते.
    - केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प लोकसभेत मांडल्यानंतरच या प्रक्रियेशी संबंधित सर्वांना नॉर्थ ब्लॉक सोडण्याची परवानगी देण्यात येते.
    - तोपर्यंत नॉर्थ ब्लॉकमधील प्रत्येक हालचालीवर केंद्रीय गुप्तचर विभागाचे कर्मचारी देखरेख ठेवून असतात. फोन कॉल्स आणि मेसेजची देवाणघेवाणही तपासली जाते.
    - नॉर्थ ब्लॉकच्या काही भागात तर फोन कॉल करणे आणि स्वीकारणे यांवरही बंदी घातली जाते. काही ठिकाणी जॅमरही बसविण्यात येतात.
    balajisurne.blogspot.in
    राज्यघटना आणि रूढी-परंपरा
    - राज्यघटनेत बजेट हा शब्द रूढ नाही.
    - राज्यघटनेतील कलम ११२ अन्वये केंद्र सरकारला फेब्रुवारी महिन्यातील ठरावीक दिवशी वार्षिक
    र्थिक ताळेबंद सादर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. रूढार्थाने त्याला 'बजेट' असे संबोधले जाते.
    - केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो.
    - १९९९पूर्वी सायंकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केला जात असे.
    ....
    अर्थसंकल्पाचा आधार
    - रोख रकमेवर आधारीत अर्थसंकल्प : आगामी आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत येणारा पैसा आणि खर्चण्यात येणारी रक्कम यांवर आधारीत हा अर्थसंकल्प असतो.
    - रूल्स ऑफ लॅप्स : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित मंत्रालयाने रक्कम खर्ची पाडली गेली नसेल, तर या पद्धतीचा आधार घेतला जातो.
    - विभागानुसार : या पद्धतीत विभागांचा विचार करून विभागवार सादरीकरण होते.
    ..
    अर्थसंकल्पाची कागदपत्रे
    - वार्षिक आर्थिक निवेदन, अनुदानाची मागणी, वित्त विधेयक, जमा ताळेबंद, खर्चाचा ताळेबंद, अर्थसंकल्पाचा सारांश, ठळक बाबी, घोषणांच्या अंमलबजावणीची सद्य स्थिती, अर्थसंकल्पासाठी आवश्यक माहिती, अर्थमंत्र्यांचे भाषण.

    संदर्भ : Maharashtra Times| Feb 24, 2016.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad