• New

    राज्यासेवा 2016 मध्ये राज्यातून प्रथम आलेल्या भूषण अहिरे यांची मुलाखत



    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळविणे हे खरे तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक तरुणाचं स्वप्न! असंच स्वप्न नाशिकच्या भूषण अहिरे या तरुणानं पाहिलं. ते स्वप्न केवळ पाहून थांबला नाही. त्यासाठी आवश्यक सातत्यपूर्ण मेहनत त्याने केली. त्याचं फळं त्याला मिळालं. भूषणने राज्य सेवा परीक्षेत राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. मानसिक आणि शारीरिक कणखरता, सातत्यपूर्ण अभ्यास याच्या जीवावर त्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. खऱ्या अर्थाने मराठी तरूणांसाठी त्याने ही ‘भूषणा’वह कामगिरी केली आहे.

    त्याच्या या कामगिरीबद्दल, त्याची अभ्यासाची पद्धत, छंद-आवडनिवड, मार्गदर्शक, आई-वडील यांच्याबद्दल भूषण अतिशय जिव्हाळ्याने बोलला. विविध प्रश्नांना त्याने दिलखुलास उत्तरेही दिली.... यशामुळे दुणावलेला आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्याच्या यशाचं गमक त्याने अगदी नेमकेपणाने सांगितलं.

    कधीकाळी हुकलेल्या संधीने निराश अन् ना उमेद न होता भूषणने पुन्हा अभ्यासाकडे लक्ष दिले आणि 2014 मध्ये पोलीस उप अधीक्षक पदासाठी एका गुणाने आलेले अपयश त्याने कष्टाने आणि अभ्यासातील सातत्याने 2016 मध्ये झालेल्या परीक्षेत पुसून टाकले.

    भूषणचे आईवडील दोघेही शिक्षक. त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतून त्याने केटीएचएम महाविद्यालयातून पूर्ण केलं. त्यानंतर अभियांत्रिकी शाखेत एमईटी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान विषयासह पदवी प्राप्त केली. मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील गोराणे येथील हे अहिरे कुटुंब. आई-वडिलांच्या नोकरीनिमित्ताने ते नाशिक येथे आले. वडील अशोक अहिरे हे भगूर येथील नूतन विद्यामंदिर येथे तर आई सुनीता जिल्हा परिषदेच्या शेवगे दारणा येथील शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भूषण हा एकूलता एक मुलगा. मात्र, त्याच्या आपल्या नोकरीमुळे त्याच्या शैक्षणिक विकासावर परिणाम होणार नाही, याची संपूर्ण काळजी आई-वडिलांनी घेतली. भूषणच्या यशानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना स्पष्टपणे जाणवते. खऱ्या अर्थाने ‘भूषण’ हे नाव सार्थ केल्याची भावना ते व्यक्त करतात.

    भूषणशी संवाद साधताना एक गोष्ट सातत्याने जाणवते, ती म्हणजे, त्याच्या विचारांतील ठामपणा. तो सांगतो, ‘मी 2012 पासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. माझा हा 4 था प्रयत्न होता. यापूर्वी 2014 ला पोलीस उप अधीक्षक पदासाठी केवळ एका गुणाने मागे पडलो. कक्ष अधिकारी हे पद मिळाले. मात्र, मनाला समाधान वाटतं नव्हतं. मग, या पदावर रूजू होण्यासाठी मुदत मागून घेतली. यावेळी घरच्यांचा पाठींबा, मित्र-मैत्रिणींचा पाठिंबा आणि मनोहर भोळे सरांचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं.’

    सातत्यपूर्ण प्रयत्न करुनही हाती येणारं अपयशानेच खरं तर भूषणला पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याचा हुरूप दिला. तो म्हणतो, ‘खरंतर मला खूप नर्व्हस वाटतं होतं. अगदी व्यवस्थित अभ्यास करूनही अपयश वाट्याला का येतंय हे कळत नव्हतं. मात्र, तेव्हा भोळे सरांनी खूप समजावून घेतलं. धीर दिला. स्वप्नपूर्तीसाठी प्रोत्साहन दिलं. त्याचंच फळ आता मिळालं.’

    अभ्यासाची तयारी कशी केलीस? असं विचारल्यावर भूषणने सांगितलं, “मी सात दिवसांपैकी सहा दिवस पूर्णपणे अभ्यासाला दिले. सहा दिवस 10 ते 11 तास मी अभ्यास करायचो. मुख्य भर विषय समजावून घेण्यावर असायचा. एकदा विषय समजावून घेतला की, मग त्यानुसार अभ्यासाला सुरुवात केली. प्रत्येक विषयासाठी बाजारात खूप पुस्तकं असतात. मात्र, सरसकट काहीही वाचण्यापेक्षा नेमकं वाचन महत्त्वाचं ठरतं. त्यादृष्टीने मी पुस्तकांची निवड केली. 

    ‘आठवड्यातील एक दिवस मात्र फक्त स्वत:साठी दिला. माझी आवड ट्रेकींग, स्विमींग आणि ड्रायव्हिंग आहे. त्यासाठी वेळ दिला. त्यामुळं पुन्हा अभ्यास करताना मन कायम ताजंतवानं राहायचं. सुरुवातीला अपयश आलं तरी डगमगलो नाही, कारण मी नेहमीच मानसिक आणि शारीरिक कणखरतेवर भर दिला. त्यासाठी प्रयत्न केले,’ असं भूषण सांगतो. 

    स्वयंअध्ययन हा स्पर्धा परीक्षेच्या यशातील खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर विविध पातळ्यांवर तुम्ही घेत असलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानुसार पुढं जात राहिलांत की यश तुमचंच आहे, म्हणून समजा, असा सल्ला भूषण स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देतो. 

    तुझा आदर्श कोण? असं विचारल्यावर भूषण अगदी समर्पक उत्तर देतो. तो म्हणतो, अगदी एका व्यक्तीला आदर्श मानलं आणि नंतर त्याने भूमिका बदलली तर आपली पंचाईत होते. त्यापेक्षा आपण आपली मतं बनवावीत आणि त्यावर ठाम राहावं, अशी त्याची धारणा आहे. 

    शासकीय सेवेत आल्यावर प्राधान्य कशाला असेल? यावर तो म्हणतो, आपल्या राज्यात खूप चांगल्या योजना सर्वसामान्यांसाठी आहेत. नवीन काही करण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करणं महत्त्वाचं आहे. योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यावर माझा भर असेल, असं तो सांगतो. 

    शासकीय सेवेत रुजू झालो तरी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यासाठी अभ्यास सुरू आहे, असे सांगताना भूषणचा आत्मविश्वास दिसून येतो. 

    भूषणने मिळवलेल्या यशामुळं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळालीय. अपयशाला न घाबरता फक्त यशासाठीच प्रयत्न करायचे. यश तुमच्या प्रयत्नांना साद देते, हेच भूषण अहिरेच्या यशाने दाखवून दिलेय. सातत्यपूर्ण अभ्यास, मानसिक व शारीरिक कणखरता, स्वयंअध्ययनावर भर आणि प्रत्येक विषयांचा सखोल अभ्यास ही भूषणची यशाची चतु:सुत्री म्हणावी लागेल. भूषणला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

    Source : mahanews

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad